घोट वन विभागाच्या लाकूड डेपोला आग : १९ लाखांचे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक वन विभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागल्याची घटना २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घोट येथे घडली. या आगीत तब्बल ३५० हून अधिक लाकडांचे बीट जळून खाक झाले असून वन विभागाचे सुमारे १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोट येथील वन विभागाच्या लाकूड डेपो परिसरात अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण करत डेपोमधील मोठ्या प्रमाणातील लाकूड जाळून टाकले. आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.
या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस मदत केंद्र घोट येथे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान निकतवाडा येथील शेतकरी विनोद विश्वनाथ गुरनुले (वय ३२) यांनी शेतात लावलेली आग बिटापर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विनोद गुरनुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी शेतात किंवा जंगल परिसरात आग लावताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




