महत्वाच्या बातम्या

 आदिवासी जनसंवाद यात्रेला शिरपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी आमदार डॉ. होळींचा कार्यकर्त्यांना " बूथ मजबूत तर पक्ष मजबूत" हा विजयमंत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : शिरपूर - भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, बूथ समीकक्षीकरण, जनगणना, एस.आर.आय. तसेच पंचसूत्री कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला शिरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. काशीराम पावरा, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. रामकृष्ण खलाने, भाजपा आदिवासी मोर्चा धुळे जिल्हाध्यक्ष मा. क्रांतीलाल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख के. डी. पाटील, मोहन सूर्यवंशी, बेबीबाई पावरा, लिला सूर्यवंशी, योगेश बादल, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तिरूपात राजपूत आदी मंचकावर उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन मजबूत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाने जागरूक राहून आपली अचूक माहिती नोंदविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच एस.आर.आय. संदर्भातील विविध मुद्दे, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे आणि बूथ स्तरावर पक्ष संघटन सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार डॉ. होळी यांनी भाजपा आदिवासी मोर्चाच्या पंचसूत्री कार्यक्रमावर विशेष भर देत कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य आणि स्वजागृती या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर मजबूत संघटन उभारून भाजपा विचार गावागावात पोहोचविण्याचा निर्धार करण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

यावेळी आमदार मा. काशीराम पावरा यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर भाजपा सरकार संवेदनशीलतेने काम करत असल्याचे सांगितले. समाजाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी संघटित राहून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. रामकृष्ण खलाने यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आदिवासी मोर्चाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. बूथ स्तरावरील संघटन अधिक सक्षम करून आगामी काळात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदिवासी जनसंवाद यात्रेमुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमानंतर आगामी संघटनात्मक उपक्रम आणि पक्ष विस्ताराबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सदर जिल्हास्तरीय बैठकीला भाजपा व आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos