महत्वाच्या बातम्या

 आ.डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सिरोंचा येथे अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा अंतर्गत भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यामुळे सिरोंचा शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमस्थळी आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चना करून फित कापत अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण करण्यात आले.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा पेट्रोल पंप आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून वाहनधारकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. सिरोंचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता इंधनासाठी दूरवर जावे लागणार नसल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची व आर्थिक बचत होण्यास मदत होणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामीण व दुर्गम भागात आधुनिक सुविधा पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व विविध विकासकामांबाबत चर्चा केली. परिसरातील रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. नागरिकांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली जयसिंग केवलसिंग ठाकूर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, नगराध्यक्ष पद्मा भोगे, तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, राष्ट्रवादी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, उपसभापती कृष्णमूर्ती रिंकूला, जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेली, नगरसेवक सतीश भोगे, रवी रालबंडीवार, जगदीश रालबंडीवार, सतीश राचर्लावार, रवी सुलतान, ओम प्रकाश ताटकोंडावार तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन अत्याधुनिक पेट्रोल पंप सुरू झाल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे अभिनंदन केले. सिरोंचा शहराच्या विकासात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos