महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित


- दहेगाव वार्ड पंचायत समिती वर्धा येथील शिक्षिका मंदा बढीये यांनाही गैरवर्तणूकीमुळे निलंबित 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
नेरी पुनर्वसन पंचायत समिती वर्धा प्राथमिक शाळेचा आर्थिक कार्यभार मुख्याध्यापकांना न दिल्यामुळे तत्कालीन मुख्याध्यापक लोमेश वर्हाडे यांची पंचायत समिती वर्धा च्या शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली. चौकशी करताना मुख्याध्यापक वऱ्हाडे यांनी केलेला अपहार चौकशी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आला. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी  वऱ्हाडे यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब केले.
कॅश बुकातील रकमांचा हिशोब न जुळणे, लेजर बुकाची पाने फाडून गहाळ करणे,  शाळेचा प्रिंटर घरी वापरणे, उपस्थिती भत्ता विद्यार्थिनींना न वाटणे,साठा रजिस्टरवर पाच वर्षात कोणत्याच नोंदी न घेणे, मोफत गणवेश योजनेच्या संबंधाने नियमबाह्य कार्यपद्धती राबवणे, विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेवणे, शालेय पोषण आहाराचा निधी स्वयंपाकी बाईला वितरित न करणे , बदली झाल्यावर सुद्धा सहा महिने प्रभार न देणे, बदली झाल्यानंतर बँकेतून ३३ हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम नियमबाह्य उचल करणे, अशा प्रकारच्या अनेकनिमितता व रकमांचा अपहार चौकशीत दिसून आला. या संबंधाने पंचायत समिती वर्धा च्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लोमेश वऱ्हाडे यांना निलंबित करण्यासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत ठराव घेण्यात आला. मात्र काही आजी-माजी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशा नेत्यांच्या दबावात  वऱ्हाडे यांच्यावर कारवाई होत नव्हती. 
जिल्हा परिषदेचे काही सदस्य श्री वऱ्हाडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत आग्रही होते. सर्वसामान्य शिक्षक किंवा कर्मचाऱ्याला लहान-मोठ्या अपराधा प्रकरणी तात्काळ निलंबित करण्याची कारवाई नेहमीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. मात्र राजकीय दबावात एका संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अध्यक्षा वर कारवाई करण्यात टाळाटाळ करण्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाली होती. संबंधित श्री वऱ्हाडे शाळेत कमी आणि जिल्हा परिषदेच्या परिसरातच जास्त दिसून येत होते. 
अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी श्री वऱ्हाडे यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब केले. निलंबन कालावधीत त्यांना समुद्रपुर मुख्यालय देण्यात आले आहे. 
रकमांचा अपहार करणारे श्री वर्हाडे यापूर्वीही देवळी पंचायत समितीमधील आकोली शाळेच्या स्वच्छतागृहाचे बांधकामाचा निधी अपहार केल्याप्रकरणी निलंबित झाले आहेत.
शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून इतर शिक्षकांना आदर्शवाद शिकविणाऱ्या श्री वऱ्हाडे यांच्यावर झालेली कारवाई नियमाला धरून आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वऱ्हाडे यांच्यावर फौजदारी गुन्हा कधी दाखल करणार याकडे लक्ष लागले आहे.तसेच दहेगाव वार्ड पंचायत समिती वर्धा येथील शिक्षिका मंदा बढीये यांनाही गैरवर्तणूकीमुळे निलंबित करण्यात आले आहे .

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-20


Related Photos