पैशांवरून वाद, मुलाने वडिलांवर विटा फेकून हल्ला केला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी २२ रात्री साडेअकराच्या सुमारास पैशांवरून झालेल्या वादात एका मुलाने आपल्या वडिलांवर विटा फेकून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वडिल जखमी झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तपशील अशी आहे की, बाक्टी येथील राजू वासुदेव सांगोळे (५८) आणि त्यांचा मुलगा संघदीप सांगोळे (३१) एकाच घरात राहतात. रविवारी रात्री संघदीपने वडिलांकडे कपडे, मोबाइल आणि खर्चासाठी पैसे मागितले, मात्र यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वाद भांडणात रूपांतरित झाला, तेव्हा संघदीपने अंगणात ठेवलेली सिमेंटची वीट उचलून वडिलांच्या दिशेने फेकली. या हल्ल्यात राजू सांगोळे यांना नाकाला आणि डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर अर्जुनी-मोरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वडिलांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सद्यस्थितीत तपास हवालदार हुकरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
पोलीसांनी नागरिकांना घरगुती वादावर संयम ठेवण्याचे आवाहन केले असून, रागावून हिंसक कृती करु नये, अशी सूचना दिली आहे.
News - Gondia




Petrol Price




