मजूर व महिला सहकारी संस्थांना मिळणार बळ : आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक


- धोरण निश्चितीसाठी ५ सदस्यीय समिती गठित
- कामांचे न्याय्य वाटप अन् स्थानिक रोजगारावर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील मजूर सहकारी संस्थांसोबतच आता महिला सहकारी संस्थांनाही शासनाच्या विविध कामांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती व्हावी, या उद्देशाने या संस्थांना बळ देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी दिली.
सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मजूर सहकारी संस्थांसोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये संधी देण्याची ठाम भूमिका मांडली. या दोन्ही संस्थांना अधिक कामे मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील, असे त्यांनी अधोरेखित केले. सहकाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मुनगंटीवार यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत ना. पंकज भोयर यांनी मजूर व महिला सहकारी संस्थांना कामे देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. सध्या राज्यात विविध यंत्रणांमार्फत १० लाख रुपयांपर्यंतची कामे, ई-निविदा पद्धतीची कामे तसेच जिल्हा परिषद स्तरावरील कामे मजूर सहकारी संस्थांना दिली जातात. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि समन्वय आणण्यासाठी कामांची ऑनलाइन नोंद अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याबाबतही चर्चा झाली.
या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करून एक व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकार राज्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल सादर करावा, ज्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान ना. पंकज भोयर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. या बैठकीस सहकार विभागाचे सचिव, उपसचिव नितीन गायकवाड, अप्पर निबंधक डॉ. पी.एल. खंडागळे, जिल्हा उपनिबंधक व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिला व मजूर सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
News - Rajy




Petrol Price




