खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
धान पीक अंतिम टप्प्यात असताना भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खा. अशोक नेते यांनी पाठपुरावा केल्यामुळे  काल १८ ऑक्टोबर पासून दुपारी १.३०  ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतचे व रात्रीचे भारनियमन बंद करण्यात आले आहे. 
 गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील ग्रामीण भागात सकाळी ६ ते १०.४५  व दुपारी १.३०  ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महावितरणच्या वतीने भारनियमन केल्या जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला धान पिकांसाठी पाणी करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतावरच रात्र काढावी लागत होती. सध्या धान पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने खासदार अशोक नेते लोकसभा मतदारसंघात अनेक तालुका दौऱ्यावर गेले असता अनेक शेतकऱ्यांनी दिवसाचे भारनियमन बंद करण्याची मागणी खासदारांकडे रेटून धरली.  शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री मा. ना. सुधीर  मुनगंटीवार यांच्याकडे हा गंभीर विषय मांडला . ना. मुनगंटीवार यांनी   उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व मुख्य सचिव यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली व गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह पुर्व विदर्भातील दिवसाचे  व रात्रीचे भारनियमन बंद करण्याचा सूचना केल्या.
यावेळी मुख्य सचिवांनी संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन सुरू असून  शेतकऱ्यांची अडचण लक्षात विशेष बाब म्हणून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील भारनियमन बंद करण्यासंदर्भात तात्काळ पत्रक काढून  भारनियमन बंद करण्यात येईल असे सांगितले.   काल १८ ऑक्टोबर रोजी  सकाळी पत्रक काढून  सकाळ पासून भारनियमन बंद करण्यात आले आहे.
 तसेच कोल फिल्ड चे प्रबंध संचालक यांना ना. मुनगंटीवार यांनी विद्युत निर्मिती साठी जेवढा कोळसा लागेल तेवढा पुरविण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी कितीही निधी लागला तरी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.   ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांनी तात्काळ सूचना केल्यानंतर काल १८ ऑक्टोबर पासून दुपारी १.३०  ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतचे व रात्रीचे भारनियमन बंद करण्यात आले आहे. फक्त आता सकाळी ६ ते १०.४५  वाजेपर्यंतच ४ तास ४५ मिनिटे भारनियमन होणार असून दिवसभर व रात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतातील धान पिकाला पाणी करता येणार आहे.
 दिवसभराचे व रात्रीचे भारनियमन बंद झाले असल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या शेतीला दिवसा व रात्री पाणी पुरवठा करणे सोयीचे होणार आहे व त्यांना रात्री वन्य व हिंस्त्र प्राण्यांच्या  धोक्यापासून मुक्ति मिळणार आहे.
या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा दिल्या बद्दल   ना. सुधीर  मुनगंटीवार व ऊर्जामंत्री  ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे खासदार अशोक नेते यांनी अभिनंदन केले असून शतशः आभार मानले आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन असतांना गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील भारनियमन बंद झाले आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
तसेच हा गंभीर प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने लोकसभा क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांनी  खासदार अशोक नेते यांचे अभिनंदन केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-19


Related Photos