इराणचा अमेरिकन टँकरवर भीषण हल्ला : मुंबईतील भारतीय इंजिनिअरचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई/बसरा : इराकच्या बसरा येथील खोर अल जुबैर बंदराजवळ एका अमेरिकन तेल टँकरवर झालेल्या इराणच्या हल्ल्यात एका भारतीय मरीन इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नंदन प्रसाद सिंह असे मृत इंजिनिअरचे नाव असून, ते गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतील कांदिवली येथे वास्तव्यास होते.
नेमकी घटना काय? -
बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी मार्शल आयलँड्सचा ध्वज असलेल्या सेफसी विष्णू (Safsea Vishnu) या अमेरिकन तेल टँकरवर हा हल्ला झाला. ज्यावेळी हा टँकर समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल (Ship-to-Ship transfer) भरण्याचे काम करत होता, तेव्हा हा हल्ला झाला. या टँकरमध्ये सुमारे ४८ हजार मेट्रिक टन नेफ्था भरले जात होते.
सुरुवातीच्या अहवालानुसार, स्फोटकांनी भरलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या विना ड्रायव्हर स्पीडबोट ने (Drone Boat) जहाजाला उजव्या बाजूने जोरात धडक दिली. या भीषण धडकेनंतर जहाजावर मोठी आग लागली.
कांदिवलीतील कुटुंबावर शोककळा -
नंदन सिंह हे मूळचे बिहारचे रहिवासी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बर्नार्ड शुल्टे आणि युनायटेड ओशन शिप मॅनेजमेंट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नंदन सिंह यांचे मेहुणे चंदन कुमार यांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती कंपनीकडून मिळाली, मात्र शिपिंग मंत्रालयाने अद्याप कोणताही अधिकृत संपर्क साधलेला नाही. त्यांचा मुलगा मुंबईबाहेर असून तो शुक्रवारी परतल्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
२७ कर्मचाऱ्यांचा जीव वाचला; १५ भारतीय सुरक्षित -
जहाजावर आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या. इराकच्या कोस्ट गार्डने आणि एका एसटीएस टग ने तातडीने बचावकार्य राबवत २७ जणांना सुरक्षित वाचवले.
यामध्ये -
१५ भारतीय नागरिक
१२ फिलिपिनो नागरिक यांचा समावेश आहे.
बचाव करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बसरा बंदराजवळील एका बेटावर सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया -
बगदाद येथील भारतीय दूतावासाने नंदन सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत. दूतावास सध्या स्थानिक प्रशासन आणि कंपनीच्या संपर्कात असून इतर १५ भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे.
News - Rajy




Petrol Price




