महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रात ९-१० मार्चला तीव्र उष्णतेची लाट : काही भागात पावसाची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात उन्हाचा कडाका आता असह्य होत आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसह काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. ९ आणि १० मार्च या दोन दिवस अत्यंत उष्ण राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये ९ मार्च रोजी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची ५१ ते ७५% शक्यता आहे, तर १० मार्च रोजीही ही परिस्थिती कायम राहणार आहे. रत्नागिरीत दोन्ही दिवस हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहील. सिंधुदुर्गमध्ये ९ मार्चला हलक्या पावसाची शक्यता आहे, त्यानंतर हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र -
धुळे आणि नंदुरबारमध्ये ९ मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. जळगावमध्ये ९ आणि १० मार्च या दोन्ही दिवस हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे. नाशिकमध्ये ९ मार्चला उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे.

विदर्भ -
अकोला येथे ९, १० आणि ११ मार्च या सलग तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये ९ आणि १० मार्च, तर वर्धामध्ये १० आणि ११ मार्च रोजी तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरसाठी सध्या कोणताही इशारा नाही.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र -
छत्रपती संभाजीनगर व जालना येथे ९-१० मार्च, परभणी, बीड व हिंगोली येथे १०-११ मार्च, अहिल्यानगर (अहमदनगर) १० मार्च आणि लातूर ११ मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे.

पुणे, धाराशिव व नांदेड येथे पुढील ५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, कोणताही विशेष इशारा नाही.

पाऊस आणि गडगडाट -
कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये ९ मार्चला हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने नागरिकांना गरम उन्हापासून बचाव, पुरेसे पाणी पिणे आणि जास्त वेळ बाहेर न राहणे यासारख्या खबरदारीचा इशारा दिला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos