अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी घटित


- गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियांसाठी मदत
- पाचही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा या तालुक्यांतील प्रमुख व उपप्रमुखांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या माध्यमातून गोरगरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांतील १० टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसणाऱ्या रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी सहकार्य करणे, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांत गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीकंट गादेवार यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना समाजाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले. गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी संस्थांच्या माध्यमातून मदत मिळविण्यासाठी बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे यांनी केले.
दरम्यान, प्रणय कासवटे (एटापल्ली तालुका प्रमुख), मनिष येमुलवार (भामरागड तालुका प्रमुख), मुरली जिल्लेला (सिरोंचा तालुका प्रमुख), दिवाकर पेंदाम (मुलचेरा तालुका प्रमुख), शैलेश खोब्रागडे (उपतालुका प्रमुख मुलचेरा), मयुर त्रिनगरीवार (अहेरी शहर प्रमुख), प्रितम मेश्राम (अहेरी तालुका प्रमुख) व अंकुश मंडलवार (अहेरी उपतालुका प्रमुख) यांची निवड करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारणीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीचा मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




