मार्डी रोडवरील अपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू : चालक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : अमरावती शहरातील मार्डी रोडवरील एका शाळेजवळ २० फेब्रुवारी रोजी रात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकारात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. राजेश यादव नागदिवे (५५) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश नागदिवे हे २० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता कामावरून आपल्या दुचाकीने घरी परतत होते. मार्डी रोडवरील अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलसमोरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत नागदिवे यांच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २१ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे जावई अक्षय राजेश राऊत (३१, रा. संजय गांधीनगर) यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी उशिरा रात्री अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. शहरात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
News - World




Petrol Price




