आरमोरी विधानसभेचे आमदार यांच्या अडचणीत वाढ : मारहाण प्रकरणात जबर दुखापत कलमाची भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननावरून मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आरमोरी विधानसभेचे काँग्रेस आमदार रामदास मसराम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जखमी मजुराच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८ (२) अर्थात जबर दुखापत केल्याचे कलम वाढविले आहे. या कलमान्वये १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने संबंधित आरोपींवरील कारवाईची शक्यता बळावली आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास रेल्वे कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होते. यावेळी आमदार मसराम हे त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्याचे सांगितले जाते. उत्खननाची परवानगी आहे का, याबाबत विचारणा करत त्यांनी तेथे कार्यरत असलेला मजूर कुणाल विकास राजगडे (२४, रा. निमगाव) याच्याकडे जाब विचारला. संबंधित काम अधिकृत परवानगीने सुरू असल्याचे मजुराने सांगितल्याने वाद वाढला. त्यानंतर काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, आमदार मसराम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कुणाल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रारंभी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या क्ष-किरण अहवालात त्याच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याचे निष्पन्न झाले. या वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘जबर दुखापत’चे कलम ११८ (२) वाढविले.
या प्रकरणात निवृत्त शिक्षक धनपाल मिसार यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून, आमदार रामदास मसराम, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे तसेच चालक विजय भुरले यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




