डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त प्राध्यापकाची १ कोटी २३ लाखांची फसवणूक


- दापोली तालुक्यात खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / रत्नागिरी : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यात उघडकीला आला आहे. या प्रकरणी दापोली पोलिस स्थानकात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून विस्तार शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी यांना ४ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत आकाश शर्मा, शिवप्रकाश आणि दया नायक या तिघांनी वारंवार फोनद्वारे संपर्क साधला. फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख बंगळुरू पोलिस तसेच नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी अशी करून दिली.
संशयितांनी डॉ. जोशी यांच्या नावावर कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) शाखेत खाते असून, त्या खात्यातून तब्बल ३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा बनाव रचला. या कथित आर्थिक गैरव्यवहारात जोशी यांचा सहभाग असल्याचे सांगत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होईल, अशी धमकी देण्यात आली.
५० लाख दंड व डिजिटल अरेस्टची धमकी -
या कथित गुन्ह्याप्रकरणी ५० लाख रुपयांचा दंड आणि ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येईल, अशी भीती दाखवत संशयितांनी डॉ. जोशी यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला. सतत फोन करून चौकशी, गुन्हा नोंद आणि अटकेची धमकी दिल्याने जोशी घाबरले. संशयितांच्या सूचनेनुसार त्यांनी ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्यास सुरुवात केली.
या कालावधीत डॉ. जोशी यांनी एकूण १ कोटी २३ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, पैसे भरूनही संशयितांकडून आणखी पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांत तक्रार, तपास सुरू -
आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉ. जोशी यांनी दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. या तक्रारीनुसार आकाश शर्मा, शिवप्रकाश आणि दया नायक या तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, संबंधित बँक खाती, फोन कॉल्स आणि डिजिटल व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना डिजिटल अरेस्ट, बनावट पोलिस व सीबीआय अधिकारी बनून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
News - Rajy




Petrol Price




