महत्वाच्या बातम्या

 सोलापूर–पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सोलापूर : मुंबईहून हैदराबादकडे जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा सोलापूर–पुणे महामार्गावर तेलंगवाडी परिसरात भीषण अपघात झाला. बुधवारी (३१) सकाळी घडलेल्या या अपघातात खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक एनएल ०१ बी १८६९) सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.

अपघाताची तीव्रता अधिक असल्याने खासगी ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात बसचालकास किरकोळ दुखापत झाली असून घटनेची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना देण्यात आली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी दिली.





  Print






News - World




Related Photos