आयुर्वेदिकच्या नावाखाली ॲलोपॅथी औषधांची विक्री : दिग्रसमध्ये औषधी विक्रेत्यावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / यवतमाळ : आयुर्वेदिक औषध असल्याचे सांगून ग्राहकांच्या माथी ॲलोपॅथीचे घटक असलेली बनावट औषधे मारली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी परवानाधारक औषधी दुकानांतून अशा औषधांची सर्रास विक्री सुरू असून, दिग्रस येथील एका प्रकरणात प्रयोगशाळेच्या अहवालावरून औषधी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे महिन्यात घेण्यात आलेल्या औषधी नमुन्यांचा अहवाल अलीकडेच प्राप्त झाला असून, त्याआधारे शुक्रवारी कारवाई करण्यात आली.
दिग्रस शहरातील नामांकित महावीर मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स येथे हृदयम नावाचे आयुर्वेदिक औषध विकले जात होते. औषधी निरीक्षकांनी मे २०२५ मध्ये या औषधाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. तपासणीत सदर वेदनाशामक औषधात आयुर्वेदिकऐवजी ॲलोपॅथीचे घटक आढळून आले. त्यामुळे हे औषध बनावट व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी औषधी विक्रेते नयन नविचंद गड्डा यांच्याकडे औषधाच्या पुरवठादाराबाबत चौकशी करण्यात आली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सुरुवातीला फ्लिपकार्टवरून औषध मागविल्याचे त्यांनी सांगितले; मात्र त्याबाबत कोणतेही अधिकृत देयक सादर करू शकले नाहीत. याशिवाय फ्लिपकार्ट कंपनीनेही संबंधित औषधाचा पुरवठा आम्ही करत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) स्पष्ट केले. औषधाचा उत्पादक व वितरक यांची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१८, २७६, २७७ तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४५ मधील कलम १८(क), १८(अ), २२ व ३३ ईईए १६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानातील औषध आले कुठून -
दरम्यान, पांढरकवडा येथील एका औषधी दुकानात ‘मेड इन पाकिस्तान’ असा उल्लेख असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा आढळून आला. ही उत्पादने नेमकी कुठून आली, याचा सुगावा लागू शकलेला नाही. संबंधित विक्रेत्याने हैद्राबाद येथील उत्पादकाचा पत्ता दिला होता; मात्र त्या नावाचा कोणताही उत्पादक अस्तित्वात नसल्याचे तपासात समोर आले आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सर्रास ॲलोपॅथीचे घटक वापरले जात असून, १०० टक्के आयुर्वेदिक असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आयुर्वेदिक औषध घेताना सतर्क राहण्याचे आवाहन -
आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत, डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज नाही, असा गैरसमज समाजात पसरलेला आहे. एखाद्याच्या अनुभवावर किंवा सांगण्यावरून अनेकजण अशी औषधे घेतात; मात्र ती खरोखर आयुर्वेदिक आहेत का, याची खातरजमा केली जात नाही. केवळ नफ्यासाठी विक्रेते रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आयुर्वेदिक तसेच इतर कोणतीही औषधे घेताना तपासून, अधिकृत व नोंदणीकृत दुकानांतूनच खरेदी करावी, असे आवाहन औषधी निरीक्षकांनी केले आहे.
News - Rajy




Petrol Price




