हैदराबाद-विजापूर महामार्गावर भीषण बस अपघातात २० ठार : अनेक प्रवासी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / तेलंगणा : देशात प्रवासी बस अपघातांची मालिका सुरूच असून, काल राजस्थानातील अपघातानंतर आज तेलंगाणातही भीषण दुर्घटना घडली. रंगारेड्डी जिल्ह्यातील मिर्झागुडा गावाजवळ हैदराबाद-विजापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने प्रवासी बसला दिलेल्या जोरदार धडकेत २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि एका दहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे.
तंदूर डेपोची बस सुमारे ७० प्रवाशांना घेऊन हैदराबादच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणारा खडीने भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने थेट बसवर जाऊन आदळला. या भीषण धडकेत बसचा समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. ट्रकमधील खडी बसवर कोसळल्याने अनेक प्रवासी त्या ढिगाऱ्याखाली दबले. अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.
स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तीन जेसीबींच्या सहाय्याने बसवरील ढिगारा दूर करून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना चेवेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना अधिक उपचारांसाठी हैदराबादमधील विविध रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातात बस व ट्रक चालकांचा मृत्यू झाला असून, अपघाताचे कारण ट्रक चालकाचे नियंत्रण सुटणे हे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.दरम्यान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्य सचिव रामकृष्णा राव आणि डीजीपी बी. शिवधर रेड्डी यांना तत्काळ बचाव व मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच सर्व जखमींना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
News - World




Petrol Price




