वेस्ट इंडिजचा जबरदस्त प्रतिकार : चौथा दिवस कॅरेबियनचा


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध दमदार झुंज दिली. पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात कॅरेबियन फलंदाजांनी पुनरागमन करत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग रोखला.
जॉन कॅम्पबेल (११५ धावा, १९९ चेंडू) आणि शई होप (१०३ धावा, २१४ चेंडू) यांनी शतकी खेळी साकारत वेस्ट इंडिजच्या डावाला भक्कम पाया दिला. दोघेही बाद झाल्यावर भारतीय संघाला चौथ्या दिवशीच विजयाची संधी निर्माण झाली होती; मात्र ती जस्टिन ग्रीव्ह्सच्या लढाऊ खेळीमुळे हातातून गेली.
ग्रीव्ह्सची नाबाद फिफ्टी, सील्सची साथ -
कर्णधार रोस्टन चेस (४०) बाद झाल्यानंतर ग्रीव्ह्सनं मैदान गाजवलं. जेडेन सील्सच्या साथीने त्याने ७९ धावांची भागीदारी रचली. ग्रीव्ह्सनं नाबाद अर्धशतक ठोकत वेस्ट इंडिजचा डाव ३९० धावांपर्यंत नेला. जसप्रीत बुमराहनं अखेरीस ही जोडी फोडली आणि भारतीय संघासमोर १२१ धावांचं साधं लक्ष्य ठेवलं. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन, तर सिराजने दोन आणि रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाचव्या दिवशी निकाल, पण चौथा दिवस वेस्ट इंडिजचा -
१२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या रुपात भारताने एकच विकेट गमावली. लोकेश राहुल (२५ नाबाद) आणि साई सुदर्शन (३० नाबाद) यांनी भारताला ६३ धावांपर्यंत नेले. अखेरच्या दिवशी भारताला फक्त ५८ धावा आणि वेस्ट इंडिजला ९ विकेट्स हव्या आहेत. निकाल ठरलेला असला तरी चौथा दिवस वेस्ट इंडिजच्या लढाऊ वृत्तीचा ठरला.
फॉलोऑन देण्याआधी गिलला विचार करावा लागेल -
पहिल्या डावात २७० धावांनी पिछाडीवर राहिल्यानंतर शुबमन गिलनं फॉलोऑन दिलं होतं. मात्र दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द ही टीम इंडियासाठी धडा ठरली. या संघर्षानंतर गिल पुढीलवेळी फॉलोऑन देण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल, असंच चित्र या सामन्यात दिसून आलं.
टीम इंडियाचा विजय निश्चित असला तरी चौथा दिवस कॅरेबियन डे ठरला.
News - World




Petrol Price




