पत्नीच्या मैत्रीवरून पतीचा कहर : पत्नीचा गळा चिरला, मित्रावरही कटरने वार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने भरदिवसा रक्तरंजित थरार घडवून आणला. पत्नीची एका व्यक्तीशी केवळ मैत्री असतानाही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा चिरला, तर तिच्या मित्राच्या छातीवर कटरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी सदर व सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भूमेश्वर पिसे (४५, रा. हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. तो ट्रक चालक आहे. त्याची पत्नी रेणुका पिसे ही सदर येथील खासगी बँकेत नोकरीस आहे. रेणुकाची हुडकेश्वर येथील शैलेंद्र मानारकर याच्याशी केवळ मैत्री होती. मात्र संशयाच्या छायेत जगणाऱ्या भूमेश्वरने अनेकदा पत्नीशी वाद घालत अखेर हिंसक मार्ग स्वीकारला.
सोमवारी दुपारी ३.१५ वाजता त्याने एका स्टेशनरी दुकानातून कटर विकत घेतले. बँकेत पोहोचून त्याने पत्नी रेणुकाला पार्किंगमध्ये बोलावले. वादावादी सुरू होताच त्याने अचानक तिच्या गळ्यावर कटर फिरवला. गंभीर जखमी झालेल्या रेणुकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर आरोपी थेट सीताबर्डी येथे शैलेंद्रच्या दुकानात पोहोचला. त्याला बाहेर बोलावून झाशी राणी चौकाजवळ त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. शैलेंद्रने कटर पकडण्याचा प्रयत्न केला, तरीही भूमेश्वरने त्याच्या गालावर आणि छातीवर वार केले. यात शैलेंद्र गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सदर व सीताबर्डी पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच त्याने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
प्रेमविवाहानंतरही संशय -
भूमेश्वर व रेणुकाचा प्रेमविवाह झाला होता. तरीदेखील तो तिच्यावर सतत संशय घेत असे. या रक्तरंजित घटनेनंतर रेणुका व शैलेंद्र दोघेही इस्पितळात उपचार घेत असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, आत्मसमर्पण केल्यानंतर भूमेश्वर सातत्याने पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करत असल्याचे समजते.
News - Nagpur




Petrol Price




