सावनेरमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या


- प्रेमप्रकरणातील वादातून घटना घडल्याची शक्यता; पोलिसांच्या कारवाईत पाच जण ताब्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सावनेर शहरालगतच्या गुजरखेडी येथील नागमंदिराजवळ शुक्रवारी (१९) रात्री झालेल्या हल्ल्यात करणसिंग रमेशसिंग परसराम (३०, रा. वेकोलि कॉलनी, सावनेर) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
करणसिंग हा माळेगाव (टाऊन) शिवारातील एका कंपनीत कामगार होता. शुक्रवारी रात्री तो काही मित्रांसह नागमंदिराजवळ उभा असताना दोन आरोपींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. एकाने गळ्यावर तर दुसऱ्याने पोटावर चाकूचे वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तो कोसळताच आरोपी पसार झाले. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील एका तरुणीच्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादामुळे ही हत्या झाल्याचा संशय आहे. करणसिंगचा या प्रकरणाशी थेट संबंध नसतानाही तो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना बळी पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी सावनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सावनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सर्व आरोपी माळेगाव (टाऊन) व परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
News - Nagpur




Petrol Price




