महत्वाच्या बातम्या

 फ्रान्समध्ये जनआक्रोश : मॅक्रॉन सरकारविरोधात आंदोलने तीव्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पॅरिस : नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही सरकारविरोधी जनआक्रोश उसळला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणांविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून राजधानी पॅरिससह देशभरात तीव्र आंदोलन पेटले आहे. या आंदोलनादरम्यान तोडफोड, जाळपोळ झाली असून, पोलिसांवर दगडफेक करण्याचे प्रकारही घडले आहेत.

लोकांचे म्हणणे आहे की, मॅक्रॉन सरकारने जनतेच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यातच आर्थिक व्यवस्थापन ढासळल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावरील ब्लॉक एव्हरीथिंग या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनाचे स्वरूप संघटित केले आहे.

आंदोलकांनी वाहतूक ठप्प केली असून, कचराकुंड्या पेटवण्यात आल्या आहेत. अनेक भागांत पोलिस व आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हजारो पोलिस तैनात करण्यात आले असले तरी आंदोलन आटोक्यात आणणे कठीण झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुरक्षा दल सतर्क ठेवण्यात आले असून, काही आंदोलनकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.





  Print






News - World




Related Photos