कुलगाममध्ये दहशतवादी ठार : आर. एस. पुरा येथे पाकिस्तानी घुसखोर जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा पूर्ण खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी हाती घेण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
या चकमकीत लष्कराचा एक जेसीओ जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले असून, या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शोधमोहीम अद्याप सुरू आहे.
विशिष्ट माहितीच्या आधारे पोलिस, लष्कराच्या ९ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने गुड्डर वन परिसरात शोधमोहीम सुरू केली. संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही जोरदार प्रतिकार करत चकमक पेटवली. यात एक दहशतवादी ठार झाला.
दरम्यान, जम्मूतील आर. एस. पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला जेरबंद केले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी सिराज खान असे त्याचे नाव असून, तो रविवारी रात्री ऑक्ट्रोय चौकीजवळ सीमेच्या कुंपणातून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना पकडला गेला. त्याच्याकडून पाकिस्तानी चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून, भारतीय भूभागात प्रवेश करण्यामागील हेतू शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
News - World




Petrol Price




