महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांचे २५० कोटी थकीत : आर्थिक अडचणींना तोंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या २२ हजार १०५ शेतकऱ्यांचे तब्बल २५० कोटी १२ लाख रुपये पाच महिन्यांपासून थकले असून, निधीअभावी ही रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

शासनाच्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामात ६० हजार २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४९ हजार ७७२ शेतकऱ्यांनी २० लाख ७४ हजार क्विंटल धान विक्री केली असून, त्याची एकूण किंमत ४७७ कोटी ८७ लाख रुपये इतकी आहे.

यापैकी फक्त १० हजार ५०६ शेतकऱ्यांना २०४ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. उर्वरित २२ हजार १०५ शेतकऱ्यांचे २५० कोटी १२ लाख रुपये थकले असून, पाच महिने उलटूनही हे पैसे मिळालेले नाहीत.

सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी -
सध्या खरीप हंगाम सुरू असून, सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. अशा वेळी पैसे अडकून पडल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडले आहेत. अनेकांनी गरज भागविण्यासाठी धान लवकर विकले, पण पैसे न मिळाल्याने सावकार व नातेवाइकांच्या दारात मदतीसाठी जावे लागत आहे. काही शेतकरी रोज बँकेच्या चकरा लावत असून, खाते तपासण्यात व्यस्त आहेत.

सावकाराच्या कर्जाचा व्याजभोग -
खरीप हंगामातील लागवड, रोवणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. धान विक्रीचे पैसे मिळाले की कर्ज फेडू, असे नियोजन होते. मात्र रकमेचा विलंब झाल्याने आता त्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकलेली रक्कम मंजूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





  Print






News - Gondia




Related Photos