महत्वाच्या बातम्या

 गोंदिया : मानसिक त्रासाला कंटाळून एमबीबीएस विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा एक एमबीबीएस विद्यार्थी प्राध्यापकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (१०) मध्यरात्रीनंतर १.३० ते २ वाजेच्या सुमारास शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकातील भाड्याच्या खोलीत घडली.

आवेश कुमार (२२, रा. भरतनगर, राजस्थान) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपपवर चिठ्ठी पोस्ट करून घेतला गळफास -
मिळालेल्या माहितीनुसार, आवेश कुमार हा वसतिगृहात राहण्याची सुविधा असतानाही शीतला माता मंदिर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. घटनेच्या वेळी त्याने मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हाताने लिहिलेली चिठ्ठी पोस्ट केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या चिठ्ठीत त्याने वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. मी स्वतः रुग्ण असून सहानुभूतीची अपेक्षा होती, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. मी चूक केली, पण ती इतकी मोठी नव्हती की त्यासाठी माझ्या आई व कुटुंबाबद्दल नको ते बोलावे, असे त्याने लिहिले आहे. तसेच संबंधित वर्तनाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असून, एका प्राध्यापकाचे नावही नमूद केले आहे.

मित्रांनी वाचवला जीव -
आवेशचा मेसेज व्हायरल होताच त्याचे वर्गमित्र तात्काळ खोलीवर धावले. त्यांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवून तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

चार सदस्यीय चौकशी समिती नेमली -
घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली असून, यात डॉ. अपूर्व पावडे, डॉ. व्ही. पी. रूखमोडे, डॉ. स्नेहा आणि वॉर्डन मनू शर्मा यांचा समावेश आहे.

वसतिगृह असूनही भाड्याची खोली का?
आवेशकडे वसतिगृहाची सोय असूनही तो भाड्याच्या खोलीत राहत होता. कधी वसतिगृहात तर कधी भाड्याच्या खोलीत राहण्याचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, ही बाब महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात आली नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, महाविद्यालय प्रशासनानेही प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos