महत्वाच्या बातम्या

 श्रीनगरच्या प्रशिक्षणातून बल्लारपूरच्या नगर प्रशासनाला नवी दिशा; नगराध्यक्षा डॉ. अलका वाढई यांच्यासह लोकप्रतिनिधींचा सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहराचा विकास केवळ रस्ते, नाल्या आणि इमारतींपुरता मर्यादित नसून सक्षम प्रशासन, पारदर्शक कारभार आणि पर्यावरणपूरक नियोजनातून शहराचा सर्वांगीण विकास साधता येतो. याच दृष्टीने बल्लारपूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे आयोजित अभ्यासदौरा व प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. या उपक्रमातून नगर प्रशासनाच्या कामकाजातील बारकावे, कायदेशीर तरतुदी आणि आधुनिक शहर व्यवस्थापनाचे विविध पैलू समजून घेण्याची संधी मिळाली. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण शिबिरात बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणादरम्यान विभागीय संचालक तथा प्रमुख प्रशिक्षक डॉ. जयंत पाठक यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील महत्त्वपूर्ण तरतुदी, कायद्यातील अद्ययावत सुधारणा, लोकप्रतिनिधींचे अधिकार व जबाबदाऱ्या आणि सभागृहाच्या कामकाजाची नियमावली याबाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा अधिक प्रभावीपणे कशा उपलब्ध करून देता येतील, यासोबतच घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनावरही त्यांनी प्रकाश टाकला.

शहराच्या विकासात पर्यावरण संवर्धनाची भूमिका अधोरेखित करत जम्मू-काश्मीर शासनाशी संलग्न पर्यावरणतज्ज्ञ डॉ. ताहेर अली यांनी पर्यावरणाचे संतुलन, स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करून शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचीही माहिती देण्यात आली.  या अभ्यासदौऱ्यामुळे बल्लारपूरच्या लोकप्रतिनिधींना नगरपरिषदेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि कायदेशीर प्रक्रियांची अधिक स्पष्ट जाणीव झाली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सुविधा सुधारण्याबरोबरच शहराच्या विकासाचे नियोजन अधिक परिणामकारक करण्यासाठी नवे दृष्टिकोन मिळाले. श्रीनगरमधील या प्रशिक्षणाचा अनुभव बल्लारपूर शहराच्या आगामी विकासकामांमध्ये उपयोगी ठरणार आहे. विशेषतः स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने या अभ्यासदौऱ्यामुळे नगर परिषदेला कामकाजात नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







  Print






Related Photos