संविधान दिनानिमित्त बल्लारपूरमध्ये समतेचा जागर : हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान उत्सव समिती व मित्र परिवार, बल्लारपूर यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी विद्यानगर वार्डातील पाली बौद्ध विहारासमोरील भव्य पटांगणावर संविधान दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, संविधान निष्ठेची शपथ, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला बल्लारपूर शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. मंचावरील मान्यवरांसह उपस्थित हजारो नागरिकांनी हात उंचावून संविधानाप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेतली. या सामूहिक शपथविधीमुळे संपूर्ण परिसरात संविधानिक मूल्यांविषयी आदर आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शन केले. संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचा आधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार आणि कर्तव्ये समजून घेऊन तरुणांनी शिक्षण, संघर्ष आणि संघटनेच्या माध्यमातून प्रगती साधावी. संविधानाचे रक्षण करणे हेच खरे राष्ट्रप्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार सुभाष धोटे यांनी संविधानामुळे सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना समान हक्क मिळाले असून समतेचा हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. प्रा. दिलीप चौधरी यांनी संविधान निर्मितीचा इतिहास उलगडून सांगत विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी संविधानाचे वाचन करून त्यातील मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले. अॅड. फरहात बेग यांनी संविधानातील मूलभूत हक्क, धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या विषयांवर मार्गदर्शन केले. संविधान हा सर्व धर्मीयांना एकत्र बांधणारा महत्त्वाचा धागा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजोग मेढे तसेच अनुसूचित जाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांतील सर्वधर्मीय धर्मगुरू, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. बौद्ध भिक्खूंचा विशेष सन्मान करण्यात आला, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांचाही आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात धम्मरक्षित रणदिवे संघ, मुंबई यांच्या चमूने ‘जागर समतेचा’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. काव्य, नाट्य, संगीत आणि आंबेडकरी शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. समतेचा जागर करणाऱ्या गीतांनी आणि शाहिरीने संपूर्ण पटांगण दणाणून गेले. उशिरापर्यंत नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे संचालन स्वेता जंगपल्लीवार आणि श्रीनिवास मासे यांनी केले, तर संतोष बेताल यांनी प्रास्ताविकातून संविधान दिनाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या संविधानिक मूल्यांचे महत्त्व विशद केले. शेवटी आयोजक राजू झोडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवारातील सदस्य आणि उपस्थित नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी चेतन गेडाम, नागेश रत्नपारखी, संपत कोरडे, सचिन मेश्राम, गणपत इटनकर, जितेंद्र करमनकर, संजय झिल्लेवार, कर्मवीर सौदागर, देशपाल मून, राहुल गायकवाड, विवेक खुटेकमाटे, नरेश गुंडापल्ली, असलम शेख, वाझीद, आकाशकांत दुर्गे, आनंद रामटेके, प्रदीप झामरे, अनिल सुखदेवे, अॅड. मेघा भाले, प्रियंका नाईक, निरंजन काकू, सपना मोरे, बंडू पडवेकर, बंडू फुलझले, गुरु कामटे, मिलिंद गेडाम, अविनाश पोहणकर, किशोर मेश्राम, बशीर सिद्दीकी, किशन केसकर, प्रितम पाटील, विश्वास देशभ्रतार आदींसह बल्लारपूर शहर व परिसरातील हजारो महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य आयोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




Petrol Price




