महत्वाच्या बातम्या

 लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीसोबत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी गणेशपूर येथील २४ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अश्वीन नवघरे २४, रा. गणेशपूर, ता. आरमोरी, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध जुळवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२० रोजी रात्री अंदाजे १०.४५ वाजतापासून ते २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.४६ वाजता आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६९, ८९ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल (अपराध क्रमांक ५५६/२०२६) करण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन झनक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता पाचांगणे करीत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान तपासातून कोणती माहिती पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos