महत्वाच्या बातम्या

 भरधाव दुचाकीची शिक्षकाला धडक; गंभीर जखमी शिक्षकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नामकरण सोहळ्यासाठी बाम्हणी येथे आलेल्या शिक्षकाला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कृष्णाबापू श्रावणजी देवाडे ५३ वर्ष , रा. वसुंधरा नगर, नागभीड असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नागभीड-कांपा मार्गावरील बाम्हणी येथे घडली. कृष्णाबापू देवाडे हे समता विद्यालय, पाहार्णी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. २० नोव्हेंबर रोजी त्यांच्या काकांच्या नातीचा नामकरण सोहळा असल्याने ते शाळेतून बाम्हणी येथे आले होते. सायंकाळी कार्यक्रम सुरू असताना लघुशंकेसाठी ते बाहेर पडले. यावेळी नागभीड-कांपा महामार्ग ओलांडत असताना नागभीडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ३४ बीएस ९८४० क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकी गणेश चंद्रभान कावळे रा. कांपा हा चालवत होता.

धडकेमुळे देवाडे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. अपघातात दुचाकीचालकही जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने देवाडे यांना ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता त्यांना नागपूर येथील किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ संजय दयाराम देवाडे यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुचाकी चालक गणेश कावळे याचा विरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास नागभिड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





  Print






Related Photos