महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ३८७ मतदारांना पुन्हा संधी


- एसआयआर प्रक्रियेंतर्गत १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणीमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.  भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत एकूण १ लाख ३३ हजार ३८७ मतदारांच्या नोंदी विविध कारणांमुळे करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३७ हजार ३८६ मृत मतदार, १२ हजार ३२३ अनुपस्थित मतदार, ७० हजार ५९८ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १२ हजार ७९८ आधीच नोंदणी झालेले मतदार आणि २८२ इतर मतदारांचा समावेश आहे.
 मतदारांना त्यांच्या पूर्वीच्या मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अथवा ईसीआयनेट ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येईल. पूर्वीच्या पत्त्यावर वास्तव्यास असलेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-ब मधील निवेदन, तर राज्यांतर्गत स्थलांतरित मतदारांनी नवीन पत्त्याचा तपशील व पुराव्यासह परिशिष्ट-क मधील निवेदन सादर करावे. अशा स्थलांतरित मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-८ सादर करण्याची आवश्यकता नाही.


मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांशी संपर्क साधून गणना प्रपत्र प्रत्यक्ष अथवा व्हॉट्सॲप, ई-मेल व एसएमएसद्वारे उपलब्ध करून देतील. तसेच बुक ए कॉल विथ बीएलओ या सुविधेच्या माध्यमातून मतदारांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान नमुना-६ सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. यादीत नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करावे आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

 





  Print






Related Photos