इर्रीच्या झुडपी जंगलात जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा : १९ जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील इर्री येथील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मंगळवारी २५ ऑगस् रात्री धाड टाकून मोठी कारवाई केली. तासपत्तीवर जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पकडलेल्या आरोपींकडून रोख रकमेसह मोटारसायकल, १४ अँड्रॉइड मोबाइल, चारचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांसह एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते.
रात्री ११ वाजता जुगार अड्ड्यावर धाड -
२५ ऑगस्ट रोजी एलसीबी पथकाला गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इर्री येथील झुडपी जंगल परिसरात काही जण तासपत्तीवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईची तयारी करून रात्री सुमारे ११ वाजता संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काहींनी पोलिसांच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी १२ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून काही जण पसार होण्यात यशस्वी झाले.
१२ लाखांचा मुद्देमाल जप्त -
कारवाईत पोलिसांनी ६८ हजार ३०० रुपये रोख, अंदाजे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, २ लाख ६१ हजार रुपये किमतीचे १४ अँड्रॉइड मोबाइल, ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ४ हजार ५५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जुगार खेळताना पोलिसांच्या ताब्यात आलेल्यांमध्ये मोहित दीपक साखरे २८ वर्षे जब्बारटोला, नितेश राजू बागडे २७ वर्षे बाजपेयी चौक, दिनेश ऊर्फ राहुल राजकुमार चतुर्वेदी १९ वर्षे सतनामी मोहल्ला, यादव चौक, डोहेल कमलकुमार बारे २१ वर्षे सतनामी मोहल्ला, यादव चौक, मधुकर धनिराम गोंडाणे ५१ वर्षे ठाणा, ता. आमगाव, शिवकुमार टेकलाल लिल्हारे ४२ वर्षे न्यू लक्ष्मीनगर मुकेश भागवत भोंडेकर ४२ वर्षे बघोली, विलास घनश्याम मानकर २४ वर्षे गौतमनगर, गोंदिया, प्रलय सुभाष मेश्राम ३५ वर्षे रतनारा, आकाश दिलीप भिमटे ३२ वर्षे छोटा गोंदिया, विक्की राजू मस्करे २७ वर्षे रतनारा आणि आशिष सुखदेव उके २९ वर्षे संजयनगर, गोविंदपूर यांचा समावेश आहे.
चौघे जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती -
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, इर्री येथील सदर जुगार अड्डा किसन रमेश दमाहे (४५, रा. इर्री), मुकेश ऊर्फ बल्ला भगवानदास बिरीया (४५, रा. मुरपार, रावणवाडी), सतीश तेजराम मेंढे (४०, रा. सुपलीपार) आणि जितू मोहनसिंग पाराशर (३८, रा. संजयनगर, गोविंदपूर, गोंदिया) हे चौघे मिळून चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांची चाहूल लागताच तिघे पसार -
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच निलेश उके ४० वर्षे गोंडीटोला, कुडवा, विवेक रहिले २७ वर्षे इर्री आणि अभय विजय बारई २३ वर्षे यादव चौक, गोंदिया) यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पसार झालेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या संबंधित तरतुदींनुसार एकूण १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील कारवाईचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असून, पसार आरोपींचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




Petrol Price




