महत्वाच्या बातम्या

 विनापास रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची धडक कारवाई


- मोहाडी-खापा–सिंदपुरी मार्गावर ८ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी-खापा ते सिंदपुरी रस्त्यावर विनापास व विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. २३ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत रेतीसह बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ८ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर देबीलाल शरणागत २९ वर्षे रा. सोनेगाव, ता. तुमसर हा ट्रॅक्टरमधून रेतीची वाहतूक करताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक पास अथवा रॉयल्टी नसल्याचे स्पष्ट झाले.

परवानगीशिवाय रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली. वाहनाला क्रमांक नसल्याचेही तपासणीत आढळून आले. रेती आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची एकत्रित किंमत ८ लाख ६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई -
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलिस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी यांच्या अहवालावरून सिहोरा पोलिस ठाण्यात जयशंकर शरणागत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सुरू -
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार कुंभरे करीत आहेत. रेती कुठून आणण्यात आली, तिची वाहतूक कोणत्या ठिकाणी केली जात होती तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असतानाच झालेल्या या कारवाईमुळे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





  Print






Related Photos