चोरावर ज्याची नजर, त्यालाच घेवून पसार झाला चोर!


- गडचिरोलीत चोरट्याचा कारनामा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: हल्ली शहरात व गावा - गावातील व्यावसायीक आपल्या दुकानांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करतात. या माध्यमातून चोरांवर नजर ठेवल्या जात आहे. तसेच ‘आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात’ अशी स्पष्ट सुचना सुध्दा लिहिलेली दिसून येते. मात्र या सर्व सुरक्षिततेवर चोरटा भारी पडला असून चोरांवर नजर ठेवण्यासाठी लावलेला सीसीटीव्ही कॅमेराच चोरट्याने लांबविल्याची घटना गडचिरोली शहरात उघडकीस आली आहे.
शहरातील चामोर्शी मार्गावरील कात्रटवार काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या श्री मोबाईल गॅलरीच्या संचालकांनी आपल्या दुकानाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दुकानाच्या आतच नव्हे तर दुकानाबाहेरसुध्दा कॅमेरा बसविण्यात आला होता. मात्र हा बाहेरील कॅमेरा चोरट्याने लांबविला आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना ७ ऑक्टोबर रोजीची आहे. मोबाईल गॅलरीच्या संचालकांनी दुसऱ्या दिवशी बघितले असता कॅमेरा आढळून आला नाही. त्यांनी फुटेज तपासले असता एक युवक कॅमेरा काढून नेत असल्याचे कैद झाले होते. चोरट्यांवर नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारणे सुरू केले आहे. यामुळे पोलिस विभागाने गस्त वाढविण्याची मागणी व्यावसायीकांकडून केली जात आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-13


Related Photos