महत्वाच्या बातम्या

 नि:शुल्क उपचारासाठी नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड काढावे : सौम्या शर्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार हवा असल्यास नागरिकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढावे लागणार आहे. आरोग्याच्या विविध उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामपंचायत स्तरावर, आपले सरकार केंद्रावर हे आयुष्मान कार्ड काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी आयुष्मान कार्ड अवश्य काढावे व मोफत उपचार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी येत्या डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी मोहीम सुरुवात झाली आहे. ॲपद्वारे सुद्धा कार्ड काढण्याची सोय आहे.

काय आहे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड -

आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेत १२०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचारांचा समावेश आहे

गोल्डन कार्ड कसे काढाल ?

गोल्डन कार्ड काढण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे लाभार्थी स्वतः कार्ड काढू शकतो. तसेच आशा स्वयंसेविकांना देखील कार्ड काढण्यासाठी लॉगिन आयडी देण्यात आले आहेत. सुरुवातीला मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर मधून आयुष्मान ॲप डाऊनलोड व इन्स्टॉल करा. त्यानंतर आधार फेस आयडी इन्स्टॉल करा. आयुष्मान ॲपमध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्यायाची निवड करा. रजिस्टर्ड मोबाईलवर ओटीपीच्या सहाय्याने लॉगिन करा. त्यानंतर सर्व पर्याय मध्ये नाव आधार कार्ड क्रमांक आणि राशन कार्ड ऑनलाइन आयडी द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. त्यानंतर पात्र लाभार्थी यांची इ के वाय सी आधार कार्डशी सलग्न मोबाईल किंवा फेस ऑथ च्या माध्यमातून पूर्ण करता येते. किंवा संकेतस्थळाला भेट द्या.

आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजने अंतर्गत शासन लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

नागपूर जिल्ह्यात ३३ लाख २४ हजार ९१७ लाभार्थी आहेत. यातील ८ लाख ७५ हजार नागरिकांकडे हे कार्ड आहे. ग्रामीण भागातील उर्वरित १२ लाख ३० हजार नागरिकांनी हे कार्ड काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos