अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा : उद्धव ठाकरे


वृत्तसंस्था / अयोध्या :  अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. तसेच आम्ही एनडीएतील सर्व पक्ष त्यांच्यासोबत आहोतच. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अध्यादेश आणून आपण राम मंदिर बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर आहेत. रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
 लोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी, या मागणीचा पुनरूच्चार केला. 
मी गेल्या वर्षी अयोध्येत आलो होतो. तेव्हा पुढील वर्षी पुन्हा येईन असे आश्वासन दिले होते. आज मी माझे आश्वासन पूर्ण केले आहे. ठाकरे यांनी एनडीए सरकार लवकरच अयोध्येत राम मंदिर बांधेल असा विश्वास व्यक्त केला. उद्यापासून संसदेचं कामकाज सुरू होत असून रामलल्लाचं दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत आहेत, असे उद्धव म्हणाले. यापूर्वी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत अयोध्यावारी करणाऱ्या उद्धव यांनी आज ‘पहले मंदिर, फिर संसद’ अशी घोषणा दिली. निवडणुकीपूर्वी केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला होता. राम मंदिर व्हावं ही लोकांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. राम मंदिर व्हावे ही बाळासाहेबांना वाटत होतं. हिंदू लोकांनी एकत्र राहावं यासाठी शिवसेनेने कधीही महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढविल्या नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.   Print


News - World | Posted : 2019-06-16


Related Photos