महत्वाच्या बातम्या

 दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात चावडी सभा

- अतिदुर्गम भागातील गावांत होणार विकासात्मक कामे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : अतिदुर्गम भागातील गावांत विविध विकासात्मक कामे करून गावाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.

राज्याच्या शेवटचा टोक व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेल्या अतिदुर्गम जवेली (बु.) येथे आयोजित चावडी सभेत ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, येमलीचे सरपंच ललिता मडावी, जवेली (बु.) चे सरपंच दामजी रावजी हिचामी, उपसरपंच शाहू येसू पोटावी, जवेली (बु.) चे गाव पाटील तथा ग्रामसभा अध्यक्ष मुरा मनकु पोटावी, कन्हाळगावचे पाटील मनिराम नरोटे, कन्हाळगावचे ग्रामसभा अध्यक्ष ईश्वर नरोटे, ग्रामसभा सचिव नरेश परसा, कर्रेम गाव पाटील किशन इष्टम, ग्रामसभा अध्यक्ष माहू कोटामी, सचिव राजेश इष्टम, मेंढरी गाव पाटील वसंत नैताम, ग्रामसभा अध्यक्ष प्रसुर नैताम, सचिव संदीप नैताम तसेच जवेली (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून एटापल्ली तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील बरेच गावांत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही विकासाचे सूर्योदय झाले नाही. जवेली (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावांची हीच स्थिती. एटापल्ली ते जारावंडी मुख्य रस्त्यावरील फाट्यावरून तब्बल ४ ते ५ किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेला जवेली (बु.) गाव वसले आहे. या ग्रामपंचायत अंर्तगत जवेली (बु.) मेंढरी, कर्रेम, कारका, कन्हाळगाव अश्या ५ गावांचा समावेश आहे. या गावात जायला ना मुख्य रस्ता, ना मूलभूत सुविधा, अश्या परिस्थितीत गावकऱ्यांनी नुकतेच अहेरी गाठून भाग्यश्री आत्राम यांच्यासमोर समस्या मांडले. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन क्षणाचाही विलंब न लावता दुसऱ्याच दिवशी जवेली (बु.) येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून गावकऱ्यांशी चावडी सभेतून चर्चा केली.

यादरम्यान पाच गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडली व निवेदन दिले. निवेदनात मुख्य रस्ता मंजूर करणे, विजेची समस्या सोडविणे, रेशन वेळेवर उपलब्ध करून देणे,पोलीस प्रशासनाकडून होणारा त्रास थांबविणे, शेती सपाटीकरण करून देणे, गोठूल बांधकाम करून देणे, सांस्कृतिक भवन मंजूर करणे तसेच विविध विकासात्मक कामासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. भाग्यश्री आत्राम यांनी आदी मूलभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तर मुख्य रस्त्यावरून गावाला जोडणारा रस्त्याचे काम मंजूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याअनुषंगाने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे चर्चाही केली. विशेष म्हणजे जवेली (बु.) परिसरातील नागरिक समस्या घेऊन अहेरी गेले असता भाग्यश्री आत्राम यांनी त्यांच्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जवळून जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला. भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने या भागात विकासाचे सूर्योदय होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos