महत्वाच्या बातम्या

 धावत्या ट्रकमधून पडलेल्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू


- गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर वाकणे पडले जीवावर; सावंगी येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर धावत्या ट्रकमधून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (२०) मध्यरात्री सुमारे २.३० वाजता घडली. हसमुख जिवा रोहित (४९, रा. रवीकुंज, बोरसद, गुजरात) असे मृत क्लीनरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसमुख रोहित हे ट्रकवर क्लीनर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी रात्री संबंधित ट्रक रायगड (छत्तीसगड) येथून सेनापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, मध्यरात्री सुमारे २.३० वाजता ट्रक सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेसमोरून जात असताना हा प्रकार घडला.

गुटखा थुंकण्यासाठी बाहेर वाकले -
ट्रक धावत असताना हसमुखभाई यांना गुटखा थुंकायचा होता. त्यासाठी त्यांनी ट्रकच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर वाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते धावत्या ट्रकमधून रस्त्यावर कोसळले.

धावत्या ट्रकमधून खाली पडल्याने हसमुखभाई गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डुग्गीपार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद -
घटनेची माहिती मिळाल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली. या घटनेप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार खोतले करीत आहेत. घटनेच्या नेमक्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, धावत्या वाहनातून बाहेर वाकणे अथवा दरवाजा उघडून बाहेर पाहणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वाहनातील प्रवाशांनी आणि चालक-वाहकांनी प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.





  Print






Related Photos