... ही तर शहीदांची विटंबनाच !


- नागरिकांच्या भावना दुखावल्या, याला जबाबदार कोण?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १५ जवान शहीद झाले. जवानांना सर्वत्र श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. त्यांचे फोटो असलेले बॅनर लावले जात आहेत. मात्र केवळ फोटो लावून मेणबत्ती जाळून संवेदना व्यक्त करणे ऐवढेच काम आहे काय, असा प्रश्न गडचिरोलीतील एका दृश्यावरून उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या असून याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
नुकतेच १५ मे रोजी पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शेकडो लोक हातात मेणबत्ती घेवून शहीदांना श्रध्दांजली अर्पण करीत होते. या ठिकाणी शहीदांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहे. श्रध्दांजलीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आपआपल्या घरी निघून गेले. मात्र उरलेल्या मेणबत्त्या , फुले खाण्यासाठी डूंकरांनी इंदिरा गांधी चौकातील चबुतरा ताब्यात घेतला. या डूकरांनी चहूबाजूंनी घाण करून ठेवली. इंदिरा गांधी चौकातील या चबुतऱ्यावर अनेकदा कार्यक्रम घेतले जातात. फुले, मेणबत्त्या टाकून ठेवल्या जातात. यामुळे या ठिकाणी नेहमीच डूकरांचा वावर असतो. या चबुतऱ्याला कसल्याही प्रकारचे संरक्षण नाही. यामुळे बॅनर लावून कार्यक्रम आटोपल्यानंतर शहीदांचे फोटो असलेले बॅनर काढून टाकणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. यामुळे डूकरांनी शहीदांचे फोटो असलेल्या बॅनरसमोर प्रचंड घाण करून ठेवली आहे. यामुळे ही शहीदांची विटंबना नाही काय, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या असून याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.  आणखी असे प्रकार होऊन नागरिकांच्या भावना दुखावू नये यासाठी  तातडीने बॅनर हटविण्याची मागणी होत आहे. 

नगर परिषद प्रशासनाने कठडे उभारावेत

इंदिरा गांधी चौकात हायमास्ट च्या भोवती चबुतरा आहे. या ठिकाणी अनेकदा श्रध्दांजली तसेच इतर कार्यक्रम घेतले जातात. खरे तर या ठिकाणी असे कार्यक्रम घेणे बरोबर आहे की नाही याबाबत नगर परिषद प्रशासनालाच माहित. मात्र या चबुतऱ्याभोवती कठडे उभारून थोडेफार सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. या चबुतऱ्यावर अनेकदा वाहनेसुध्दा चढलेली आहेत. यामुळे संरक्षणासाठी थोडीफार व्यवस्था करण्याची जबाबदारी नगर परिषदेने घ्यावी, असे नागरीकांमधून बोलल्या जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-17


Related Photos