सरकारने हाती घेतली व्हिलेज बुक संकल्पना : तब्बल ४४ हजार ग्रामपंचायती फेसबुकवर अवतरणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर  :
  राज्यातील ४४ हजार ग्रामपंचायतींची माहिती लवकरच फेसबुक टाकली जाणार आहे. राज्य सरकारने व्हिलेज बुक ही संकल्पना हाती घेतली असून, सर्व ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात येत आहेत़ व्हिलेज बुक शब्दापुढे गावाचे नाव टाकून प्रत्येक गाव, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे प्रत्येकाचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ अहमदनगर जिल्ह्यातील १ हजार ३१३ ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ त्यावर शासनाच्या योजना, गावातील विकास कामांची माहिती, प्रकल्प, रस्ते, ग्रामबैठका आदी माहिती अपलोड करण्यात येणार आहे़ सरकारने फेसबुककडे तांत्रिक मार्गदर्शन मागविले होते़ त्यानंतर व्हिलेज बुक संकल्पना हाती घेण्यात आली. 
ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे पेज चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  त्यावरून अधिकाऱ्यांशी थेट संवादही साधता येणार आहे़ मुख्यमंत्री, मंत्रालयातील अधिकारीही या पेजचा वापर करुन थेट गावाशी संवाद साधू शकतील, अशी माहिती ‘आपले सरकार’ योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक विठ्ठल आव्हाड यांनी दिली़
तसेच फेसबुक पेजवरून नागरिकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे थेट तक्रारी, सूचना करता येतील. त्यांची दखल घेण्याचे निर्देशही सरकारने दिले.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-04


Related Photos