दुष्काळग्रस्त भागातील १० मार्गांवरील शिवशाहीच्या फेऱ्या बंद करणार


-  वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला निर्णय 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  एसटी महामंडळातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वातानुकूलित बस असलेल्या शिवशाहीच्या राज्यातील १० मार्गांवरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, बंद करण्यात आलेल्या मार्गांपैकी ७ मार्ग हे मुंबईहून सुटणाऱ्या एसटी फेऱ्यांचे आहेत. बंद करण्यात आलेल्या बहुतेक फेऱ्या दुष्काळग्रस्त भागातील आहेत. 
'भाडेतत्त्वावरील काही शिवशाही (स्लीपर) गाड्या सेवेतून कमी होत आहेत. त्यामुळे कमी भारमानाच्या फेऱ्या बंद होत आहेत. एप्रिल महिन्यातील ज्या शेवटच्या दिवसांचे आगाऊ आरक्षण झालेले असेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनची फेरी आगाऊ आरक्षणासाठी त्वरीत बंद करावी. सध्या गर्दीचा हंगाम सुरू असल्याने ही बाब महत्त्वाची समजून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी', असे लेखी आदेश वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत. 
एसी शिवशाहीचे भाडे आवाक्याबाहेर असल्यामुळे या मार्गावरील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. ४ एप्रिल रोजी महाव्यवस्थापकांनी लेखी आदेश दिल्यानंतर ६ एप्रिलपासून मुंबईहून सुटणाऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून, उर्वरित मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 
  एसी स्लीपर शिवशाहीचे राज्यात एकूण ४४ फेऱ्या आहेत. त्यापैकी सात मार्गावरील १४ फेऱ्या मुंबईतून मार्गस्थ होतात. मात्र, प्रवासी भारमान कमी असल्याने आणि खासगी कंपन्यांनी शिवशाही कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी मुंबईतील सात मार्गांवरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

बंद होणाऱ्या फेऱ्या 

- बोरिवली-उदगीर (उदगीर-मुंबई) 

- मुंबई-लातूर (लातूर-मुंबई) 

- मुंबई-अक्कलकोट (अक्कलकोट-मुंबई) 

- बोरिवली-उमरगा (उमरगा-बोरिवली) 

- मुंबई-उस्मानाबाद (उस्मानाबाद-मुंबई) 

- मुंबई-मेहकर (मेहकर-मुंबई) 

- मुंबई-परळी (परळी-मुंबई) 

१०२८- एकूण शिवशाही 

८८- स्लीपर शिवशाही 

४४ - राज्यातील स्लीपर शिवशाहीच्या फेऱ्या 

१४- मुंबईतील फेऱ्या 

७- मुंबईतील बंद होणारे मार्ग 

१० - राज्यातील बंद होणारे मार्ग 

राज्यातील बंद होणारे मार्ग 

- पुणे-यवतमाळ-पुणे 

- चंद्रपूर-औरंगाबाद-चंद्रपूर 

- चोपडा-पुणे-चोपडा   Print


News - Rajy | Posted : 2019-04-08


Related Photos