महत्वाच्या बातम्या

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्य विधी  सेवा प्राधिकरणांच्या निर्देशाप्रमाणे आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.बी. अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच न्यायाधीशांचे सभागृह, जिल्हा न्यायालय विस्तारीत इमारत येथे आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश एस.वि. देशपांडे होते तर अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष  अॅड.रोशन बागडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर सचिन पाटील उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे ओचित्य साधून कोविड-१९ मध्ये मृत्यू पावलेल्यांच्या पाल्यांना ३१ वारस प्रमाणपत्रे आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी मुदत ठेव योजनेअंतर्गत एकूण ३०  लाख रुपयांची मुदत ठेवी प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवर आणि आय.एस.डी.एस. फाउंडेशनच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक  आनंद मांजरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या अॅड. सुरेखा बोरकुटे यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा वकील संघ, नागपूरचे पदाधिकारी, कोव्हिड-१९ मध्ये मृत्यू पावलेल्यांचे पाल्य व त्यांचे नातेवाईक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, लोक अभिरक्षक कार्यालयाचे अधिवक्ता, पॅनल अधिवक्ता, विधी स्वयंसेवक, महिला व बाल विकास विभागचे अधिकारी, कर्मचारीवृंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी आणि अशासकीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos