आकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद या चार  आकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी नीती आयोगाकडून उपाययोजना  सूचविण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्ह्यांची आढावा बैठक झाली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद  साधला.
 केंद्र शासन आणि नीती आयोगाने सूचित केल्यानुसार या चार जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेश व कौशल्य निर्माण, मुलभूत सुविधा आदी विभागांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौभाग्य (सहज बिजली घर योजना), उजाला योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांना समावेश असून या योजनांची जिल्हास्तरावर अधिक  प्रभावी अंमलबजावणी करावी. या जिल्ह्यांतील विकासकामांचे ठरवून दिलेले उद्दिष्टे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी दर दोन महिन्यांनी आढावा  घेण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय  कुमार, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, आदिवासी विकास विभागाचे सचिव मनीषा वर्मा  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   Print


News - Rajy | Posted : 2018-08-27


Related Photos