गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली शपथ


वृत्तसंस्था / पणजी : गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी आज शपथ घेतली. त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. राजभवनात सावंत यांच्यासह एकूण ११ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी रविवारी रात्रभर गोवा भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली होती. या बैठकीला स्वत: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र सहा तासाच्या या बैठकीनंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला नव्हता. आज सायंकाळी पुन्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री उशिरा भाजप नेत्यांनी राजभवनमध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवनातच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनाही उपमुख्यमंत्रिपदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक आणि निलेश कॅबरल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गोवा फॉरवर्ड आणि मगो या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. यामुळे भाजपने सत्ता टिकवण्यासाठी त्यांची मागणी पूर्ण केलीय. 
प्रमोद सावंत हे दोन वेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले होते. त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, असे भाजपने ठरवले होते. त्यामुळे पक्षसंघटनेतून पुढे आलेल्या सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आलीय. ते मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती असलेल्या सावंतांनी कोणतंही मंत्रीपद भूषविलेलं नाही. मात्र, पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना थेट मुख्यमंत्रिपदी बसविले आहे. सावंत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
राज्यात विधानसभेच्या चार जागा रिक्त असून, त्यातील तीन मतदारसंघात पुढील महिन्यांत पोटनिवडणूक होत आहे,तर पर्रीकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात नंतर पोटनिवडणूक होणार आहे.  



  Print






News - World | Posted : 2019-03-19






Related Photos