महत्वाच्या बातम्या

 जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू


- आणखी तीन विद्यार्थिनी गंभीर; जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचा आरोप, वसतिगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आणखी तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे.

सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश -
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहात विद्यार्थिनींच्या संख्येच्या तुलनेत झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींना जमिनीवर गाद्या अंथरून झोपावे लागत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विद्यार्थिनी झोपेत असतानाच सापाने काही मुलींना दंश केला.

सर्पदंशाची घटना लक्षात येताच वसतिगृहात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वी किंवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींना सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देणे, वसतिगृह परिसराची नियमित स्वच्छता करणे, सर्पप्रतिबंधक उपाययोजना राबविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक असताना त्याबाबत कितपत दक्षता घेतली जात होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसतिगृहाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न -
या दुर्घटनेनंतर वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा मुद्दा चर्चेत आला आहे. विद्यार्थिनींना जमिनीवर झोपण्याची वेळ का आली? वसतिगृहात पुरेशा खाटा उपलब्ध का नव्हत्या? परिसरात सापांचा वावर लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? वसतिगृहाची नियमित साफसफाई केली जात होती का? तसेच सर्पदंशासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आवश्यक व्यवस्था होती का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.

अधीक्षिकेच्या अनुपस्थितीवरही प्रश्नचिन्ह -
घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, अधीक्षिकेच्या अनुपस्थितीबाबतची अधिकृत स्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

वसतिगृहात घटना घडली त्यावेळी देखरेखीची व्यवस्था काय होती, विद्यार्थिनींना तातडीची मदत किती वेळात मिळाली आणि वैद्यकीय उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया कशी राबविण्यात आली, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी -
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उपचार घेत असलेल्या तीन विद्यार्थिनींच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने सुरक्षा तपासणी करून विद्यार्थ्यांच्या निवासासाठी आवश्यक सुविधा, पुरेशा खाटा, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित करणारी ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा ठरली आहे. या घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos