एम.जे.एफ. सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांची बौद्धिक चमक : आयडियल व वैभव कॉन्व्हेंटचे विद्यार्थी अव्वल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी लहान वयापासूनच व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर संचलित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एम.जे.एफ. सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल रविवारी २ ऑगस्ट जाहीर करण्यात आला असून नववी व दहावी गटात आयडियल कॉन्व्हेंट आणि वैभव कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
२६ जुलै रोजी आयोजित या स्पर्धेत बल्लारपूर व परिसरातील विविध शाळांमधील २६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाचे महत्त्व सांगून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली.
स्पर्धेत आयडियल कॉन्व्हेंट, वैभव कॉन्व्हेंट, साईबाबा कॉन्व्हेंट, रेडरोज कॉन्व्हेंट, नगरपरिषद गांधी विद्यालय, सर्वोदय विद्यालय, थापर हायस्कूल, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, जनता विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तसेच येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाला येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुधा वासाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) हिंदी विभाग प्रमुख प्रा. दिव्या वर्मा होत्या. प्रास्ताविक प्रा. संगीता खोब्रागडे यांनी केले, तर बारावीचा विद्यार्थी समर्थ याने सूत्रसंचालन केले.
यावेळी प्रमुख अतिथी सुधा वासाडे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सामान्य ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया तयार होतो, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. दिव्या वर्मा यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीनंतर अर्ध्या अभ्यासक्रमावर आधारित विशेष परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
दहावी गटात आयडियल कॉन्व्हेंटचा हार्दिक चौधरी प्रथम, वैभव कॉन्व्हेंटचा निखिल डार्लवार द्वितीय, नगरपरिषद गांधी विद्यालयाची जैनब सिद्दिकी तृतीय, कर्मवीर विद्यालय (येनबोडी)चा प्रीत ढोडरे चतुर्थ आणि साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटची खुशी शर्मा पाचवी आली.
नववी गटात वैभव कॉन्व्हेंटचा गणराज बहुरिया प्रथम, कर्मवीर विद्यालय (येनबोडी)चा स्वस्तिक ढोंगे द्वितीय, केजीएन कॉन्व्हेंटची नेहा प्रसाद तृतीय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची वैष्णवी बहुरिया चतुर्थ, तर आयडियल कॉन्व्हेंटचा प्रत्युष बोयोनी पाचवा ठरला.
याशिवाय विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा प्रकारच्या सामान्य ज्ञान स्पर्धा नियमित आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा लाभे आणि आदिती गहेरवार यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Chandrapur




Petrol Price




