महत्वाच्या बातम्या

 गुडेम येथे दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट : १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील गुडेम गावात दुचाकीच्या बॅटरीसोबत खेळत असताना झालेल्या भीषण स्फोटात १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गुडेम गावासह संपूर्ण अहेरी तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलाचे नाव लोकेश गणेश निकाले वय १४ वर्षे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश हा घराजवळ दुचाकीच्या बॅटरीसोबत खेळत होता. याचदरम्यान अचानक बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, त्यामध्ये लोकेशच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेला लोकेश घटनास्थळीच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला त्वरित उपचारासाठी स्थानिक स्तरावर हलविण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कामज नगर येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत लोकेशची प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेमुळे निकाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलाचा अशा प्रकारे झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावणारा ठरला आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पालकांनी आपल्या मुलांना वाहनांच्या बॅटरी, विद्युत उपकरणे तसेच इतर धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवावे, तसेच अशा वस्तूंशी खेळू न देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. थोडासा निष्काळजीपणा देखील मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो, याची ही घटना दुःखद आठवण करून देणारी आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos