आरोग्य अमृत महोत्सवानिमित्त उद्यापासून वर्ध्यात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील पहिले भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर २२ ते २४ जुलैदरम्यान बच्छराज धर्मशाळा प्रांगण, शास्त्री चौक, वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्यास राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, अरुण लखानी, रवींद्र चव्हाण, समीर कुणावार, राजेश बकाने, सुमित वानखेडे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या तीन दिवसीय शिबिरामध्ये वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांची तपासणी केली जाणार आहे.
याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, मोफत औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांगांना सहाय्यक साहित्य वितरण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी आणि लाभार्थी सहाय्य केंद्रदेखील शिबिरस्थळी कार्यरत राहणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र नोंदणी व तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीपासून तपासणी, उपचार आणि औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तपासणीसाठी स्वतंत्र कक्षांची व्यवस्था -
नागरिकांच्या सोयीसाठी महिलांसाठी नोंदणी व्यवस्था पार्किंग शेड क्रमांक १ ते ७, तर पुरुषांसाठी पार्किंग शेड क्रमांक १ ते १४ मध्ये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व हृदयरोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक १०,११ व १२, तर पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १३ मध्ये होईल. ईसीजी तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक ९ आणि पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १४ मध्ये करण्यात येणार आहे.
स्त्रीरोग तपासणी कक्ष क्रमांक ८ मध्ये, दंत तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक ७ व पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १५ मध्ये, अस्थिरोग व कर्करोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक ६ व पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १६ मध्ये, त्वचारोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक ५ व पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १७ मध्ये, तर कान-नाक-घसा तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक ४ आणि पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १८ मध्ये केली जाणार आहे. रक्त तपासणीसाठी कक्ष क्रमांक ३ राखीव ठेवण्यात आला आहे.
औषध वितरण महिलांसाठी कक्ष क्रमांक २ आणि पुरुषांसाठी कक्ष क्रमांक १९ मध्ये करण्यात येईल. मोफत चष्म्यांचे वाटप दुपारी २ नंतर महिलांसाठी कक्ष क्रमांक १ आणि पुरुषांसाठी कक्ष क्रमांक २० मध्ये होणार आहे. मानसोपचार सेवा कक्ष क्रमांक २२ मध्ये उपलब्ध राहणार असून रक्तदान शिबिर लहान हॉलमध्ये, नेत्र तपासणी मोठ्या हॉलमध्ये तसेच असंसर्गजन्य रोग तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणीसाठी खुल्या जागेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे तसेच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या दुर्मिळ आणि उपयुक्त आरोग्य सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
News - Wardha




Petrol Price




