महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक शिक्षकांच्या १५ प्रमुख प्रलंबित प्रश्नांवर शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे प्रशासनाला निवेदन


- मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; लवकरच कार्यवाहीचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक, वेतनविषयक व शैक्षणिक प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी ९ जुलै २०२६ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार तसेच उपशिक्षणाधिकारी परसावार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात एकूण १५ महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वर्ग-३ प्राथमिक शिक्षक संवर्गाला एकस्तर पदोन्नती वेतननिश्चिती करताना प्राथमिक शिक्षक पदाच्या नजिकची पदोन्नतीची एस-१४ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच शिक्षकांकडून बी.एल.ओ.सह विविध अशैक्षणिक कामे काढून घेऊन त्यांना पूर्णवेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

पदवीधर व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ तातडीने मंजूर करणे, आंतरजिल्हा बदलीने गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची सेवा नियमित करणे तसेच न्यायालयीन आदेश व ऑनलाइन बदलीमुळे बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये अशोक बोरकुटे, श्रीकांत काटेलवार, महादेव दुर्गे, वसंत गव्हारे यांच्यासह इतर शिक्षकांच्या प्रकरणांचाही उल्लेख करण्यात आला.

याशिवाय शाळांमध्ये जिओ टॅग फोटो काढण्याची प्रणाली बंद करावी, रिक्त असलेली विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे मूळ सेवाज्येष्ठतेनुसार त्वरित भरावीत, शासकीय सुट्ट्यांच्या काळात कोणतेही प्रशिक्षण आयोजित करू नये, तसेच तालुकास्तरीय तात्पुरते समायोजन करताना शिक्षकांना शक्यतो त्याच केंद्रात अथवा जागा उपलब्ध नसल्यास लगतच्या केंद्रात समायोजित करण्यात यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत वेतन देयके त्वरित अदा करावीत, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषद निधीतून वेतनवाढ द्यावी, मावा नार मावा शाळा हा उपक्रम पूर्णपणे उमेद किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावा, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध चाचणी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशीही मागणी संघटनेने केली.

पं.स. अहेरी येथील मिलिंद कुमार किशोर मेश्राम व पं.स. सिरोंचा येथील मासा आत्राम यांचे थकीत नियमित वेतन तातडीने अदा करण्यात यावे. तसेच मिलिंद मेश्राम यांची कोरची येथे बदली झाल्याने त्यांना त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. मृत शिक्षक अथवा शिक्षिकांच्या पाल्यांना संबंधित शिक्षकांच्या मूळ सेवापुस्तकाची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणीही संघटनेने केली.

बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांच्यासह योगेश ढोरे, चक्रपाणी कन्नाके, पुंडलिक देशमुख, बापू मुनघाटे, गौतम लांडगे, प्रदीप सेलोकर, राजेश चिल्लमवार, खिरेंद्र बांबोळे, सुरेश वासलवार, आशिष धात्रक, देवेंद्र लांजेवार, मंगेश गडेवार, धनेश कुकडे, समीर भजे, आकाश चांदेकर, लोकेश बारसागडे, संजय मडावी, अमरदीप भुरले, प्रभाकर गडपायले, अशोक जुवारे, प्रविण सहारे, साईनाथ अलोने, चंद्रकांत वेटे, अनिल मेश्राम, तेजराज नंदगिरवार, नरेंद्र कोतावार, रमेश रामटेके, जगदीश कळाम, राजेश बाळराजे, किरण उराडे, डंबेश पेंदाम, हरिष नंदनवार, मनोज रोकडे, राजकुमार कुळसंगे, राजेंद्र भुरसे, सुधाकर गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, विजय मंथनवार, राकेश सोनटक्के, मंगल चरडुके, संदीप उराडे, गणेश बोईनवार यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos