हिट अँड रन अपघातात कढोली येथील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू


- भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक; चालक अपघातानंतर फरार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : कढोली-सावलखेडा मार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत कढोली येथील २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने ही घटना हिट अँड रनचे स्वरूप धारण करत असून, पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. ही दुर्घटना ७ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत युवकाचे नाव नमन रणवीर इंदरकर २१ वर्षे, रा. कढोली असे आहे. नमन हा आपल्या दुचाकीने एमएच ३४ सीए ०६६० सावलखेडा परिसरातून कढोलीकडे परतत होता. त्याचवेळी सावलखेडाकडून कराडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एमएच ०२ बीडी ७९२९ त्याच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, नमन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. अपघात घडल्यानंतर कारचालकाने मदत करण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, अपघाताच्या वेळी कारची नंबरप्लेट घटनास्थळी पडल्याने पोलिसांना वाहन व चालकाचा शोध घेण्यास महत्त्वाचा धागा मिळाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कढोली येथील को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी भांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी नमनला कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नमनला मृत घोषित केले.
या अपघातामुळे कढोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू युवकाचा अकाली मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




