खरीप हंगामात डीएपीला पर्यायी खतांचा वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्यात मागील तीन वर्षांमध्ये खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाल्याची नोंद आहे. यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते आणि एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
महाराष्ट्र राज्य हे मृद परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीचा प्रभावी अवलंब करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. आगामी खरीप हंगामात पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांकडून डीएपी खताला मोठी मागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये १८ टक्के नत्र (नायट्रोजन) आणि ४६ टक्के स्फुरद (फॉस्फरस) हे महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात.
मात्र राज्यात डीएपी खताचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याला पर्यायी खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपीनंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची मोठी मागणी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
एसएसपी खत हे देशांतर्गत उत्पादनातून उपलब्ध होत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरद, सल्फर तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असतो. सल्फर या घटकामुळे तेलबिया पिकांसाठी एसएसपी खत अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, डीएपी खताच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोणी एसएसपी खतांचा वापर केल्यास तो प्रभावी पर्याय ठरू शकतो.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा योग्य वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना भंडारा जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी व्ही. यू. सोनावणे यांनी सांगितले की, उपलब्ध खतांचा संतुलित व शास्त्रीय वापर केल्यास पिकांचे उत्पादन टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पर्यायी खतांचा अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




