महत्वाच्या बातम्या

 पिपरी दीक्षित वनक्षेत्रात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू : शवविच्छेदन अहवालानंतरच कारण होणार स्पष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मध्य चांदा वनविभागांतर्गत पोंभूर्णा वनपरिक्षेत्राच्या घोसरी उपक्षेत्रातील पिपरी दीक्षित नियतवन क्षेत्रात एका नर वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. संरक्षित वनकक्ष क्रमांक ५४३ मधील तलाव परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील घोसरी उपक्षेत्रातील पिपरी दीक्षित नियतवन क्षेत्रात वनकर्मचारी नियमित गस्त घालत होते. यावेळी संरक्षित वनकक्ष क्रमांक ५४३ मधील तलाव परिसरातील झुडपांकडून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता झुडपांमध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला.

विशेष म्हणजे, याच परिसरात १२ जून रोजी एका वाघाने चार म्हशींवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने या पार्श्वभूमीवर गस्त आणि देखरेख वाढविली होती. दरम्यान, त्याच भागात वाघाचा मृतदेह सापडल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये, उपविभागीय वन अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक मंगेश गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे प्रतिनिधी राजू काहीलकर, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, राजुरा येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. नरसिंग तेलंगे, पोंभूर्णा येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. यशोदिप कांबळे, क्षेत्र सहाय्यक डेविड दुपारे तसेच अन्य वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी मृत वाघाची पाहणी केली असता तो नर वाघ असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या अवयव चोरी अथवा शिकारीशी संबंधित स्पष्ट खुणा प्राथमिक तपासात आढळल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप गूढच कायम आहे.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळीच वाघाचे शवविच्छेदन केले. आवश्यक नमुने तपासणीसाठी सुरक्षित करण्यात आले असून नियमानुसार मृत वाघाचे दहन करण्यात आले.

वन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचा मृत्यू सुमारे दोन दिवसांपूर्वी झाला असावा. मात्र याबाबतची अधिकृत पुष्टी वैज्ञानिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार आहे.

वनविभागाने सांगितले की, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण सध्या सांगणे शक्य नाही. शवविच्छेदन आणि प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल. दरम्यान, वनविभागाकडून सर्व अंगांनी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत एका प्रौढ नर वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वन्यजीव संवर्धन क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असून आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos