स्पोर्ट्स बाईक-कारच्या भीषण अपघातात तरुण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सांगली : सांगली शहरातील इनामधामणी रोडवर स्पोर्ट्स बाईक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी १७ सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित सुनील खांडेकर वय २१, रा. संभाजीनगर, शिरोळ असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित खांडेकर हा आपल्या कुटुंबीयांसह शिरोळ येथे राहत होता. तो सांगलीतील विजयनगर परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करत होता. मंगळवारी सायंकाळी काम आटोपून तो त्याची स्पोर्ट्स बाईक (क्र. एमएच १०-डीसी ०६६५) वरून घरी जाण्यासाठी निघाला होता.
तो १०० फुटी रोड, मैत्रीबन चौक ते इनामधामणी मार्गावरून जात असताना अचानक त्याच्या दुचाकीसमोर एक गाढव आल्याने त्याने त्याला धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या कारला (क्र. एमएच ०९-एफजी ३७११) चालकाच्या बाजूला जोरात आदळली.
या अपघातात रोहित रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाणे येथील कर्मचारी तुषार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, या प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
News - Rajy




Petrol Price




